सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविणार : प्रशासन लागले कामालाआरमोरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल या कालावधीत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियान जिल्ह्यातील सर्वच ४५६ ग्राम पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचा विकास व गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत सर्व ग्राम पंचायतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. समरसता व सद्भावनेची शपथ घेणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची लोकांना माहिती देणे. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाबाबत संवाद घडवून आणण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच ग्रामसभांना संबोधन करणार आहेत. त्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसभा, विशेष बैठका आयोजित करून पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणीद्वारे ऐकण्याची सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात येणार असून या समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. (वार्ताहर)असे होतील कार्यक्रम‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानांतर्गत १७ ते २० एप्रिल या कालावधीत प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये किसान सभा आयोजित करून कृषीविषयक योजनांची देणे तसेच कृषीविषयक सुधारणांबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. १९ एप्रिलला आदिवासी महिला संरपंचांचा राष्ट्रीय स्तरावर मेळावा होणार आहे. २१ ते २४ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय पंचायत राजदिन साजरा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ७३ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज संस्थेत घडून आलेले बदल स्थानिक आर्थिक विकासाकरिता ग्राम पंचायत स्तरावर विकास आराखडा तयार करणे, ग्रा. पं. ला मिळणाऱ्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधांवर करणे आदींवर चर्चा होणार आहे.
‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 01:44 IST