महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षा दर सहा महिन्यांनी घेण्यात येतात. शासनमान्य टंकलेखन संस्थेतून विद्यार्थी इंग्रजी ३०/४० आणि मराठी ३०/ ४० हे प्रशिक्षण घेत असतात. या प्रमाणपत्राला शासनाकडून संगणक अर्हताही देण्यात आली, तरी काही विभागांच्या पदभरतीच्या जाहिरातीत कॉम्प्युटर टायपिंगचा उल्लेख होत नव्हता. यामुळे पात्र उमेदवारांना आवेदनपत्र भरताना अडचणी येत होत्या. पदभरतीच्या जाहिरातीत संगणक टायपिंग प्रमाणपत्राची (जीसीसी-टीबीसी) मागणी करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संघटनेकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर, सामान्य प्रशासन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडून ५ फेब्रुवारीला परिपत्रकातून ही मागणी बंधनकारक करण्यात आली. तशा सूचना संबंधित सर्व विभागांना करण्यात आल्या आहेत. यात शासकीय विभाग, कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था, उपक्रम आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्रात राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून मान्यताप्राप्त संगणक टायपिंग (जीसीसी-टीबीसी) कोर्ससाठी विद्यार्थ्यांनी शासनमान्य संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा संघटनेचे अध्यक्षांनी कळविले आहे.