कठडे निर्मितीचे काम सुरू : अपघाताची शक्यता बळावलीविसोरा : विसोरा ते शंकरपूर या दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या नदीवर शासनाने पूल बांधले असून सदर पुलाचे बांधकाम सुरू असून उद्धाटनही झाले नाही. मात्र या पुलावरून वाहतुकीला सुरूवात झाली आहे. बांधकाम अपूर्ण असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गाडवी नदीवर १९४८ साली पूल बांधण्यात आला होता. मात्र सदर पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने या पुलावरून पाणी चढत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे खोळंबत होती. याचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन सदर नवीन उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात होती. सातत्याने मागणी रेटून धरल्यानंतर पूल बांधकामासाठी शासनाने निधी मंजूर केला व प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. पाच वर्षांत पुलाचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही पुलाच्या बाजूचे कठडे बांधणे सुरूच आहे. त्याचबरोबर पुलाला लागुन असलेल्या मार्गावर दगडाने पुलाची पिचिंग करण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला काम सुरू असल्याबाबतचे फलकही लावण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी विसोरा परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे गाढवी नदीच्या पाण्याची पातळी वाढून जुना पूल बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नवीन पुलावरून वाहने नेण्यास सुरूवात केली आहे. दुचाकी, चारचाकी प्रवाशी वाहने नेण्यास अडचण नाही. मात्र मालवाहू अवजड वाहनेही पुलावरून नेली जात आहेत.पुलाचे बांधकाम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध मुरूम, दगडाचे ढग टाकण्यात आले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या पुलाचे विधीवत उद्घाटनही झालेले नाही. तरीही वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याची पातळी वाढूनही वाहतूक सुरू असल्याने प्रवासी मात्र आनंदी असल्याचे दिसून येत आहे. धोका लक्षात घेऊन प्रशासनाने वातुकीस अटकाव टाकावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
उद्घाटनापूर्वीच गाढवी नदी पुलावरून वाहतूक सुरू
By admin | Updated: August 31, 2015 01:14 IST