शिक्षकांच्या विभागीय अधिवेशनाचा समारोप : अशोक नेते यांचे प्रतिपादनगडचिरोली : शिक्षणातूनच माणूस घडत असतो. भावी पिढीची जडणघडण शिक्षकांवरच अवलंबून आहे. शिक्षण हा माणसाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील संस्कृती लॉनमध्ये शिक्षकांच्या विभागीय अधिवेशनाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव मोहन पुरोहित, शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, प्रभू देशपांडे, विभागीय अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, सुदाम काकपुरे, कवडू पेंदोरकर, नत्थू पाटील, योगेश बन, सत्यम चकीनारप आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करू, असे आश्वासन देत शिक्षकांनी आपला आदर्श नेहमी कायम ठेवावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी यावेळी केले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्राथमिक शिक्षक परिषदेने शिक्षक, बालक, पालक व ग्रामस्थ यांच्यात समन्वय घडून आणावा, यातून गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले.शिक्षक आमदार नागो गाणार म्हणाले, शिक्षकांच्या हिताचे रक्षण, शिक्षणाचे हित व राष्ट्रहित जपणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न करावे, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधात शिक्षकांनी लढा सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, संचालन प्रमोद खांडेकर यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक शिक्षण परिषदेने प्रकाशित केलेल्या ‘शिक्षक संदेश’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षण हा विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू
By admin | Updated: February 1, 2016 01:27 IST