देसाईगंज : कमी भांडवल गुुंतवून जास्त नफा कमाविण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे तरूणाचा कल वाढला आहे़ शहरात या अवैद्य धंदयांत कमालीची वाढ होतांना दिसत आहे़ तरूणांच्या वाढलेल्या हिमतीने व पोलिस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले आहे़ अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात पहायला मिळत आहे़ बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातील तरूण कमी गुुंतवणुकीचा पानठेला, चहाची टपरी या व्यवसायाकडे वळत होते. मात्र आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमाविण्या नादात दारूविक्री, सट्टापट्टी, जुगार अशा अवैध धंद्याकडे वळल्याचे दिसून येते. पानठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षात जेवढा पैसा कमाविता येणार नाही तेवढी पैसा या अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षात कमाविता येते. अधिक पैसा कमाविण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृहउद्योग तर सट्टापट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे़ तरूणांनी सट्टापट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचा साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॅकेट मनी मिळू शकत नाही़ घरून मिळालेल्या पॅकेट मनीमध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़ यावर तरूणांनी उपाय शोधला असून सट्टापट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमाविण्यात तरूण लागले आहेत़ सट्टापट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अदांजावर आकडेमोड करून सट्टयाचे गणित मांडला जातो़ तरूणासोबत कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. कित्येक कुटुंब दिवसभर आकड्यांचा गणिताचा अभ्यास करीत असतात़ शहरात कित्येक सट्टापट्टी दलालानी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे़ या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या प्रतिमेला झळ पोहचलेली नाही़ वर्तमान पत्रात बातमी छापून आल्यावर काही दिवसासाठी हे व्यवसाय कमी होतात मात्र नंतर परिस्थिती जैसे थे असते़ गडचिरोली, चामोर्शी या शहरासह तालुक्यातही खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू आहे. मात्र त्यांच्या विरोधात धाडसत्र राबविले जात नसल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
देसाईगंज भागात अवैध धंद्यांना ऊत
By admin | Updated: August 13, 2014 23:53 IST