गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांसाठी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात नागरिकांची गर्दी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर अतिक्रमणाची संख्या वाढली आहे. आयटीआयच्या इमारतीच्या बाजूलाही काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.
प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने
कुरखेडा : कुरखेडा मार्ग तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्किंग केलेली वाहने रस्त्याकडेला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सपोर्ट करणारे मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार रस्त्यावरच चालत असतो. येथे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. अजूनही अनेक गावे अंधारातच आहेत. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्गम गावांमध्ये वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र निधी मिळत नाही.
मामा तलावांमधील अतिक्रमण कायम
गडचिराेली : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. हे अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली आहेत.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधकाचा अभाव
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बसस्थानकावर प्रवासी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र बंदच
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खुल्या जागांची दैनावस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
गाेरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कतलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावी लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.