मध्यवर्ती कार्यालयाचे निर्देश धाब्यावर : सामान्य प्रवाशीच करतात बसमध्ये गर्दीगडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत आगारांना देण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून विद्यार्थिनींची वाहतूक करताना ‘फक्त मुलींसाठीच’ हा फलक लावून या शालेय फेरीदरम्यान फक्त विद्यार्थिनींचीच वाहतूक करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व आगार प्रमुखांना दिले असले तरी गडचिरोली आगारात मात्र हा नियम धाब्यावर बसविला जात आहे. एकाही बसेसला अशा प्रकारचा फलक लावण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी मानव विकास मिशन अंतर्गत एसटी आगाराला विद्यार्थिनींच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसच्या माध्यमातून शाळा भरण्याच्या वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी संबंधित तालुक्यात बसफेऱ्या ठेवण्यात याव्या. शिल्लक असलेल्या दिवसभरात प्रवाशांची वाहतूक करावी, जेणेकरून या माध्यमातून बसचा खर्च व चालक, वाहकाच्या वेतनाचा खर्च निघण्यास मदत होईल. सदर बस केवळ मुलींची वाहतूक करण्यासाठी आगाराला देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये यासाठी इतर प्रवाशांना या बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, यासाठी संबंधित बसवर ‘फक्त विद्यार्थिनींसाठीच’ असा स्पष्ट फलक लावण्यात यावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २८ आॅक्टोबर २०१६ रोजी सर्व आगारांना दिले आहेत. मात्र याकडे बस आगार व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. गडचिरोली आगारातून दर दिवशी जवळपास ३० ते ४० बसफेऱ्या निघतात. मात्र एकाही बसफेरीवर ‘फक्त विद्यार्थिनींसाठीच’ हा फलक लावण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनी बसमध्ये चढण्यापूर्वीच प्रवाशीच या बसमध्ये चढतात व आपली सिट आरक्षित करतात. त्यामुळे विद्यार्थिनींना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. बऱ्याचवेळा बसमध्ये जागाही मिळत नाही. त्यामुळे बसस्थानकावरच उशिरापर्यंत ताटकळत राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थिनींना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थिनींच्या बसमध्ये इतर प्रवाशांची वाहतूक करून गडचिरोली आगार प्रशासन एसटीचे मध्यवर्ती कार्यालयाचे नियम धुडकावून लावत आहे. विद्यार्थिनींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘फक्त विद्यार्थिनींसाठीच’ हा फलक लावण्याचे सक्त निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)विद्यार्थी व पालक नियमाबाबत अनभिज्ञशालेय बसफेरीदरम्यान केवळ विद्यार्थिनींचीच वाहतूक करणे गरजेचे असले तरी एसटी विभाग स्वत:च्या फायद्यासाठी सर्रासपणे सामान्य प्रवाशांचीही याच फेरीतून वाहतूक करते. शालेय बसफेरी केवळ विद्यार्थिनींसाठीच असल्याची माहिती पालक व विद्यार्थिनींना नाही. याचा गैरफायदा एसटी विभागाकडून उचलण्यात येत आहे.मानव विकास समिती गोंदिया जिल्हा सर्व तालुके विशेष निमंत्रित सदस्य नरेश जैन यांनी एसटीच्या मध्यवर्ती विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर फक्त मुलींसाठीच अशा प्रकारचा फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार गडचिरोली आगारातून सुटणाऱ्या बसेसला शालेय फेरीदरम्यान ‘फक्त मुलींसाठीच’ अशा प्रकारचा फलक काही बसेसला लावला जात आहे. नवीन फलक बनविण्याचे काम सुरू आहे. नवीन फलक बनल्यानंतर शालेय फेरीच्या सर्वच बसला अशा प्रकारचे फलक लावण्यात येतील.- विनेश बावणे, एसटी आगार व्यवस्थापक गडचिरोली
बसवर ‘फक्त विद्यार्थिनींसाठी’ असे फलक लावण्याकडे आगाराचे दुर्लक्ष
By admin | Updated: January 23, 2017 00:54 IST