गडचिराेली : वीज बिलासाठी देण्यात आलेला धनादेश (चेक) बाऊंस झाल्यास त्यासाठी महावितरण प्रत्येक बिलासाठी ८८५ रुपयांचा दंड आकारणार आहे. दंडाची रक्कम पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करणार आहे. त्यामुळे महावितरणला धनादेश देताना ग्राहकांना विचारच करावा लागणार आहे.
महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरण्याची साेय उपलब्ध करून दिली आहे. तरीही काही कंपन्या तसेच शासकीय कार्यालये धनादेशाच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करतात. मात्र धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखाेड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात तेवढी रक्कम नसणे आदी कारणांवरून बँक ताे धनादेश बाऊंस करते. यासाठी बँक महावितरणवर काही प्रमाणात दंड आकारते. या दंडाची रक्कम महावितरणला भरून द्यावी लागते. ही रक्कम आता ग्राहकांकडूनच वसूल केली जाणार आहे. धनादेश दिल्यानंतर ताे क्लियर हाेण्यासाठी साधारणत: तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीज बिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळेच मुदतीच्या एक-दाेन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी असल्याचे दिसून येते.
बाॅक्स...
महिन्याला ३० धनादेश परत
धनादेशाद्वारे वीज बिलाचा भरणा प्रामुख्याने लघु उद्याेजक, शासकीय कार्यालयांमार्फत केला जाते. मात्र धनादेश वटविताना बँक प्रत्येक बाब निरखून बघते. यात थाेडीही चूक दिसून आली तरी चेक वठविला जात नाही. ताे चेक परत केला जातो. या सर्व कामात बँकेचा वेळ वाया जात असल्याने बँक ज्या कंपनीच्या नावाने चेक हाेता, त्याच्यावर दंड आकारते. जिल्हाभरातून महिन्याला जवळपास ३० धनादेश बाऊंस हाेत असून ते परत केले जातात.
बाॅक्स...
ऑनलाइन भरण्याकडे कल वाढला
- पूर्वी वीज बिल भरण्यासाठी बँका, पतसंस्था व महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर गर्दी हाेत हाेती. मात्र आता शहरातील जवळपास ५० टक्के नागरिक वीज बिलाचा ऑनलाइन भरणा करतात.
- क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बॅंकिंग, माेबाइल व्हाॅलेट, माेबाइल बँकिंगद्वारे वीज बिलाचा भरणा केल्यास ०.२५ टक्के सूट सुद्धा दिली जाते.
बाॅक्स...
प्रत्येक वीज बिलासाठी दंड
अनेक वीज बिलांचा भरणा करण्यासाठी एकच धनादेश दिला असल्यास व ताे धनादेश बाऊंस झाला असल्यास प्रत्येक वीज बिलावर दंड आकारला जाणार आहे. त्यामध्ये ७५० रुपये ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज, १८ टक्के जीएसटी म्हणजेच १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्या ग्राहकावर विलंब आकारही लावला जाईल.
बाॅक्स...
जिल्ह्यातील वीज ग्राहक
घरगुती - २,०६,७७३
उद्याेग - ९९३
कृषी - ५००
...........
थकीत देयके रुपयात
घरगुती - १३ काेटी
उद्याेग - १.३७ काेटी
..........
ऑनलाइन पेमेंट करणारे (टक्क्यात) - २० टक्के
प्रत्यक्ष काऊंटरवर जाऊन पैसे भरणारे - ७९ टक्के
चेकने बिल भरणारे - १ टक्के