लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली (धानोरा) : दीड वर्षापूर्वी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पती पत्नीला घ्यायला गेला असता, तिने परत येण्यास नकार दिल्याने मानसिक तणावातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील येरकड येथे रविवार, ३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सुधाकर नाजुकराव मडावी (३६) रा. येरकड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनीषा केशव उसेंडी रा. येरकड आणि सुधाकर मडावी रा.येरकड यांचा प्रेमविवाह १३ वर्षापूर्वी झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. नाजुकराव मडावी यांना दोन मुले होती. सुधाकरच्या मोठ्या भावानेही दहा वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
चौकशी करण्याची मागणी
एप्रिल २०२४ पासून मनीषा ही माहेरी होती. सुधाकर हा पत्नी मनीषाला घ्यायला तिच्या माहेरी गेला असता, सासरच्यांची त्याला हात धरून घराबाहेर काढले. मुलीला पाठवणार नाही. तिचे दुसरे लग्न लावून देऊ, असे ठणकावून सांगितले. यामुळे खचलेल्या सुधाकरने आत्महत्या केली, असा आरोप सुधाकरचे वडील नाजुकराव मडावी यांनी करत चौकशीची मागणी केली आहे.