कुरखेडा : तालुक्यातील शिवणी येथील सुमारे बावन्न एकरातील १९ हेक्टर क्षेत्र असलेला तलाव शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास फुटल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून धानपीक बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र यात सुदैवाने कोणतीच प्राणहानी झाली नाही. शिवणी येथील ‘बावन्न एकर तलाव’ नावाने प्रसिद्ध असलेला मोठा मालगुजारी तलाव शिवणी येथील साबू सेठ यांच्या मालकीचा आहे. त्यांच्याकडून सदर तलावाची माती काम करून डागडुजी करण्यात येते. मात्र तब्बल दहा-बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरूवारी रात्री कुरखेडा तालुक्यात जोरदार पाऊस पडला. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून, तलावही फुगले आहेत. पावसामुळे शिवणी येथील बावन्न एकरातील माजी मालगुजारी तलावाची पाळ मध्यभागातून फुटली. यामुळे शिवणी व महाजनटोला येथील शेतजमीन जलमय झाली असून, शेकडो हेक्टर क्षेत्रातील धानपीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतातील धानपीक वाहून गेले, तर काहींच्या शेतातील पीक मातीखाली आले. तलावाचे पाणी कुरखेडा-मालेवाडा रस्त्यावरुन दोन फूट उंचीपर्यंत वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सदर फुटलेल्या तलावाचे पाणी कुरखेडा-मालेवाडा या डांबरी रस्त्याला ओलांडून वासी, पळसगाव, चिनेगाव या गाव परिसरातील शेतात शिरले. त्यामुळे धानपिकाचे नुकसान झाले. रोवणीनंतर पीक जोमात येण्यास सुरूवात झाली होती. शेतातील विहिरी तसेच मोठ्या नाल्यात बसविण्यात आलेले विद्युत मोटारपंप, इंजिन व शेतीपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजय चरडे, संवर्ग विकास अधिकारी तुरकर आपत्ती व्यवस्थापन चमूसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पाणी ओसरायला सुरुवात झाली होती. येत्या तीन दिवसांत परिसरातील शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे तसेच सर्वेक्षण करावे, असे निर्देश ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांना देण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार ए. टी. चरडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
By admin | Updated: August 27, 2016 01:18 IST