गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर पंचायतीच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ आॅक्टोबर रोजी स्थगिती दिली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आरमोरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक निंबेकार, श्रीहरी कोपुलवार, हैदरभाई पंजवानी, जागोबा खेळकर, भाग्यवान दिवटे, महेश बांते या सहा जणांनी आरमोरी नगर परिषद करावी या मागणीसाठी जनहित याचिका बुधवारी दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी करण्यात आली. या याचिकेत राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व आरमोरीचे तहसीलदार यांना प्रतिवादी करण्यात आले होते. उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने आरमोरी नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया ३ आॅक्टोबर २०१५ पासून लागू होत आहे. त्यामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, असा युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने जनहित याचिका स्वीकृत करून नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे व या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ आॅक्टोबर २०१५ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. यामुळे आता आरमोरी नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया वगळून जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील तीन नगर पंचायतीसाठीच प्रक्रिया सुरू होईल. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आरमोरी नगर परिषद करण्याबाबत राज्य सरकार आपली भूमिका ठरवेल, असे दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आरमोरी नगर पंचायतीच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती
By admin | Updated: October 2, 2015 06:10 IST