गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ३१ मे २०१३ नंतर करण्यात आलेल्या २२० बदल्या रद्द करण्याच्या प्रकरणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षक कृती समिती प्रमुख गौतम मेश्राम यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. गौतम मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली १३४ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाविरोधात रिठ याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती धर्माधिकारी व न्यायमूर्ती सुकरे यांच्या द्विन्यायाधिश खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याची बाजू सकृतदर्शनी व न्यायपूर्ण योग्य असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आल्याने ८ मे २०१५ ला सात याचिकर्त्यांना स्थगनादेश देण्यात आला व १२ मे सुनावणीत ६२ शिक्षकांना स्थगनादेश देण्यात आला. १५ मे च्या सुनावणीत ६४ अशा एकूण १३३ शिक्षकांच्या बदली रद्द आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिलेला आहे, अशी माहिती गौतम मेश्राम यांनी दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. निता जोग तर प्रशासनाच्या वतीने अॅड. एच. ए. देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. (प्रतिनिधी)
२२० बदल्यांना हायकोर्टाचा स्थगनादेश
By admin | Updated: May 18, 2015 01:42 IST