लाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : माणसांचे पूर्वज म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या वानरांना आता माणसांप्रमाणे फ्रीजमधील वस्तूंची चटक लागल्याने अंकिसा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. घराच्या आवारातील फळझाडे आणि भाजीपाल्यापाठोपाठ आता वानरांनी फ्रीज उघडून त्यातील वस्तू पळविण्यापर्यंत मजल मारली आहे.गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वानरांचा हैदोस वाढला आहे. पावसाळा-हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वांगी, कारली, शेंगा आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासोबत सध्या विविध फळेही लागली आहेत. त्यावर ताव मारण्यासाठी हे वानर शेतासोबत गावातही येतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांवर, विद्यार्थ्यांवर, नागरिकांवर हल्ला करत आहेत. घरासमोरील पाण्याच्या टाकीवर उड्या मारणे, घरातील सामानासोबत फ्रीज उघडून त्यातील वस्तूंचा धिंगाणा घालणे किंवा खाण्याच्या वस्तू पळविणे या प्रकारामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.
वर्षभर घेतला उपचार- एक वर्षापूर्वी दोन माणसांवर वानरांनी हल्ला केल्याने त्यांना एक वर्षासाठी उपचार घ्यावा लागला होता. त्यामुळे या वानरांच्या भीतीने गावकरी घराबाहेर पडतानाही विचार करत आहेत. वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.