कुरखेडा येथे कार्यक्रम : अरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन कुरखेडा : सहकार क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम केल्यामुळे आज बँकेने प्रगती साधली आहे. कुरखेडा येथील भात गिरणीच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी प्रक्रिया योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करण्यात आली असून त्यांनी प्रस्ताव मंजुरीबाबत आश्वासन दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून भात गिरणीलाही निधीची मदत केली जाईल. सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. दुबार पेरणीचे संकट समोर आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भक्कमपणे उभी राहणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले. कुरखेडा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेच अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष डॉ. बळवंत लाकडे, मानद सचिव त्रियुगी नारायण दुबे, जिल्हा परिषद सदस्य जीवन नाट, बाजार समितीचे सभापती खिळसागर नाकाडे, बँकेचे संचालक व्यंकटी नागिलवार, व. मो. मेश्राम, के. सी. डोंगरवार, डॉ. दुर्वेश भोयर, अनंत साळवे, जागोबा खेळकर, बंडूजी येलावार, आसाराम सांडील, राईसमीलचे अध्यक्ष बब्बू मस्तान, मनोज अग्रवाल, कुरखेडाचे सरपंच आशा तुलावी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आनंदराव गेडाम होते. यावेळी बँकेच अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा हा सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदराचा सोहळा आहे, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन बँकेचे व्यवस्थापक अरूण निंबेकर, आभार संचालक व्यंकटी नागिलवार यांनी मानले. कार्यक्रमाला उपव्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, विधी अधिकारी अविनाश मुर्वतकर आदीसह परिसरातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला बचत गटाचे प्रतिनिधी व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना करू मदत
By admin | Updated: July 7, 2014 23:34 IST