अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : आरोग्य सेवेसाठी सर्वांनी सहकार्य करावेअहेरी : राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान, उपजिल्हा रुग्णालय अहेरी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अहेरी येथे रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आबालवृद्धांसह एकूण १ हजार २०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदयविकाराच्या एकूण २०० रुग्ण तपासणीतून ५८ रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वांनी सहकार्य करावे, गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी आदी उपस्थित होते. सदर शिबिरात हृदयविकार, दंत चिकित्सा, नेत्र, जनरल ओपीडी, औषध वितरण, इंजेक्शन आदीसह एकूण १० कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. सावंगी रुग्णालयाचे डॉ. सत्यजीत पोतदार, डॉ. गंगाधर तडस, डॉ. संजीव कुमार, गडचिरोली येथून डॉ. नागदेवते, डॉ. गेडाम, डॉ. के. रेड्डी, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. उमाटे, डॉ. इशान तुरकर, डॉ. शेंडे, डॉ. रूबिना यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.नेत्रतज्ज्ञ डॉ. तरफदार, दंत चिकित्सक डॉ. सरोज भगत यांनीही रुग्णांचे निदान केले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा कांचनवार यांनी केले तर आभार संजय उमडवार यांनी मानले. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. पाचही तालुक्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अहेरीत १,२०० रुग्णांची आरोग्य तपासणी
By admin | Updated: October 16, 2016 00:55 IST