संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : दरवर्षी थंडीची चाहुल लागताच परदेशी पक्ष्यांचे थवे निसर्गरम्य तलावांकडे धाव घेतात. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे हजारो मैल अंतर आकाशातून उंच उडत उडत ते नवेगावबांधच्या तलावात सोमवारी (दि.९) दाखल झाले. त्यांच्या आगमनामुळे पक्षी निरीक्षक,अभ्यासक सुखावले आहे. पक्ष्यांचे हे आवागमन सुरूच आहे. सुरक्षित स्थळांचा शोध घेत पाहुणे स्थिरावणार असल्याने आगामी काळात तालुक्यातील अनेक तलाव पक्ष्यांनी हाऊसफुल्ल होणार आहेत.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे सध्या लक्ष वेधून घेत आहेत. नवेगावबांध जलाशय मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी दिसून येत आहेत. राष्ट्रीय उद्यानाची भ्रमंती करायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची एक पर्वणीच ठरत आहे. हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा त्यांच्या आगमनाला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. अर्जुनी-मोरगाव तालुका निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध हे मोठे तलाव आहेत. नवेगावबांध, नवनीतपूर क्र.१ चा फुटक्या तलाव व भुरसीटोला तलावात लक्षणीय वाढ झाली आहे. विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: ऑक्टोबर महिन्यात होते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी व खाद्यानाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलिया तसेच हिमालयकडून भारतात प्रवेश करतात. पूर्व विदर्भातील तलावांचा प्रदेश त्यांना अधिक सोयीचा वाटत असल्याने येथील पाणवठे, विदेशी पक्ष्यांनी दरवर्षीच ह्यहाऊसफुल्लह्ण असतात. परंतु जलाशय व काठावर पक्ष्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. मासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना परदेशी पाहुणे अधिक पसंती दर्शवितात. अशा पाठवठ्यांवर पक्षांचे थवेच्या थवे दिसतात. सायबेरियन पक्ष्यांची संख्या भरपूर असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात. फुटक्या तलावावर यावर्षी प्रथम:च आकर्षक गुलाची चोच असलेला रेड क्रेस्टेड पोचार्ड हा पक्षी मोठ्या संख्येने दिसून येत आहे.तलावांवर या पक्षांचे आगमनयेथील विविध पाणवठ्यांवर पिंटलेस, ग्रेलग गुज, कॉमन पोचार्ड, वाईट आय पोचार्ड, युरेशियन विजन, मलार्ड गार्गनी, कोंब डक,लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चीन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरोशियन कर्लू, लिटिल स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) आदी प्रजातीचे पक्षी दिसून येत आहे.
तलावावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पोषक वातावरण व खाद्याच्या आकर्षणामुळे आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. विविध प्रजातींचे नवनवीन पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांचे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
तलावावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी
ठळक मुद्देपक्षी सप्ताहात आगमन झाल्याने पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी : पर्यटन स्थळी वाढतेय गर्दी