आरमोरी शहर व तालुक्यातील अनेक भागांत शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुरू झाला. आरमोरीसह अरसोडा, रवी, मुलूरचक, मुलूर रीठ, वघाळा, सायगाव, शिवणी, पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, रामपूर परिसरात व तालुक्यातील अनेक भागांत जवळपास दोन तास गरपिटीसह वादळी पाऊस आला. वादळी पावसाने धान, मका यासह आंबा व इतर अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसला. अनेक झाडांखाली आंबे माेठ्या प्रमाणात पडल्याचे सकाळी दिसून आले. सध्या उन्हाळी धान पूर्णतः भरलेला असून, काही दिवसांत धान कापण्याच्या स्थितीत हाेते. परंतु, वादळी पावसामुळे उभे धान जमिनीला टेकले. धान जमिनीला टेकल्याने ते कुजून खराब हाेण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली. अनेक गावांतील घरांवरचे कौले व पत्रेही उडाले. झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
गारपीट व वादळी पावसाने आरमाेरी तालुक्याला झाेडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST