गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ जुलैदरम्यान कृषी जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शेतकऱ्यांना कृषीविषयक मोफत सल्ला देण्याकरिता किसान या पोर्टलवर गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार १८१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सप्ताहादरम्यान २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत कृषी सहाय्यक मार्गदर्शन करणार आहेत. कृषी विभागाकडे १०० रूंद सरी वरंबा यंत्र उपलब्ध आहे. या यंत्राचे पेरणी व वापराबाबतचे प्रात्यक्षिक गावपातळीवर दाखविले जाणार आहे. जिल्ह्यात सध्या भात यंत्र उपलब्ध करून दिले जात आहे. या यंत्राचे १०० ठिकाणी प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. पेरणीपूर्व बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक १ हजार १३० गावांमध्ये दाखविले जाणार आहे. १०० गावांमध्ये फळबाग लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान १ हजार ५०० शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. २७८ गावांमध्ये १८ हजार ९८१ आरोग्यपत्रिकांचे वाचण व मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. कुडमुलवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे उपसंचालक विजय कोळेकर, आत्माचे संचालक अनंत पोटे, प्रीती हिरालकर, अरूण तालवरे, एम. के. सोनटक्के उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कृषी जागृती सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2015 01:52 IST