पालकांनी घेतली बैठक : देसाईगंज येथील वातावरण तापलेदेसाईगंज : विद्यार्थी व पालकांना मिळणारी अपमानजनक वागणूक तसेच शिक्षण शुल्क वाढीच्या मुद्यावरून देसाईगंज येथील कारमेल अॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात परिसरातील ३०० वर पालकांनी येथील आरमोरी मार्गावरील फारेस्ट गार्डनवर एकत्र येऊन शुक्रवारी सभा घेतली. कारमेल शाळा प्रशासनाने पालकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणत्र सामुहिकरित्या काढण्यात येईल, असे एकमताने ठरविण्यात आले. या सभेला कारमेल शाळा पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बन्सोड, उपाध्यक्ष डॉ. महेश पापडकर, प्रफुल वढे, क्रिष्णा कोडापे, सुभाष गहाणे, सुरेश साधवानी, चंदा राऊत आदींसह ३०० वर पालक उपस्थित होते. आमगाव-देसाईगंज येथील कारमेल अॅकॅडमी प्रशासनाकडून पालकांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम अदा करण्यास पालकांकडून विलंब झाल्यास कार्यरत शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना बळजबरीची शिक्षा दिली जाते, याला पालकांनी विरोध केल्यास प्रशासनाकडून त्रासही दिल्या जातो, प्रत्येक वर्षी मर्जीने शिक्षण शुल्काची रक्कम पालकांकडून वसूल केली जाते. कित्येकदा अर्धा तास विद्यार्थ्यांना दंड बैठका लावण्याची शिक्षाही दिली जाते, अशा अनेक तक्रारी बैठकीत या पालकांनी बोलून दाखविल्या.दरवर्षी विद्यार्थ्यांना कारमेल अॅकॅडमी शाळेतून पुस्तके खरेदी करावे लागतात. शिवाय पुस्तकांवर छापील किंमतीपेक्षा दुप्पट भावाने रक्कम अदा करावी लागते. तक्रारी वा विविध प्रश्नांसंदर्भात प्राचार्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असाही आरोप पालकांनी केला आहे. अखेर त्रस्त झालेल्या पालकांनी कारमेल अॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात पालक संघर्ष समितीची स्थापना करून लढा देण्याचे सभेत ठरविले. यासंदर्भात कारमेल अॅकॅडमीचे प्राचार्य अगेस्टिन येचुरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली असता, सध्या आपण केरळमध्ये आहोत, मी देसाईगंजमध्ये पोहोचल्यानंतर या प्रकाराबाबत आपणाला सविस्तर माहिती देईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर) शनिवारी आंदोलन करणारकारमेल अॅकॅडमी प्रशासनाच्या विरोधात पालक शनिवारी शाळेवर मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती बैठकीनंतर अनेक पालकांनी दिली. या आंदोलनादरम्यान पालकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्राचार्यांशी चर्चाही करण्यात येणार आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या टीसी काढण्याचाही पवित्रा पालकांनी घेतला आहे.
कारमेल विरोधात पालक आक्रमक
By admin | Updated: April 16, 2016 00:52 IST