लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासनाचे क्रीडा धोरण अमलात आणले आहे. शहरी व ग्रामीण भागात व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता व्यायामशाळेच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी ७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता १४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
राज्यात २०१२ मध्ये क्रीडा धोरण अमलात आले. यापूर्वी व्यायाम शाळेसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. हे अनुदान तोकडे असल्याच्या तक्रारी, विनंती शासनाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये शासनाने यात वाढ करून अनुदानाची रक्कम ७ लाख रुपये केली होती. त्यानंतरही व्यायाम शाळेत विविध साहित्यांची वाढती मागणी व दरामध्ये वाढ झाल्याने सदर अनुदान कमी पडत होते. अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने अनुदानाची रक्कम ७ लाख रुपयांवरून १४ लाख रुपये केली. यासंदर्भातील आदेश २३ एप्रिल २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला.
अर्ज कोठे व कसा करायचा?व्यायामशाळा उभारणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. तो अर्ज थेट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा शक्य नसल्यास तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातही सादर करता येतो.
निकष काय ?व्यायामशाळा उभारणीसाठी योग्य व आवश्यक प्रमाणात जागा असावी. अंदाजपत्रक तयार करून ते सादर करावे लागते. व्यायामशाळा योग्यप्रकारे चालविण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक.
व्यायामशाळा किती?जिल्ह्यात गत दोन वर्षात ८३ व्यायामशाळांना मंजुरी प्राप्त झाली. २०२३-२४ मध्ये ३६ तर २०२४-२५ या वर्षात ४७ व्यायामशाळांना मंजुरी देण्यात आली. २०२४-२५ या वर्षात मंजूर व्यायायमशाळांमध्ये साहित्य इन्स्टॉलेशनचे काम सुरू झालेले नाही.
व्यायामशाळेसाठी शासनाने वाढविले अनुदानव्यायामशाळेकरिता यापूर्वी ७ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात होते. व्यायामशाळा उभारणीसाठी लागणारा खर्च व वाढलेल्या साहित्याच्या किमती यामुळे व्यायामशाळेसाठी अनुदान वाढविण्यात आले.
"उत्कृष्ट खेळाडू निर्मितीसाठी व्यायामशाळा आवश्यक आहेत. आता तर शासनाने व्यायामशाळेसाठी १४ लाख रुपयांपर्यंत अनुदान वाढविले आहे. व्यायामशाळा मंजुरीसाठी इच्छुकांनी विहीत नमुन्यात प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला सादर करावे."- भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी