कोरची : येथून सात किमी अंतरावर असलेल्या बिहीटेकला ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक सुधीर डोमाजी वसाके यांनी थकीत पगार निघत नसल्याने त्रस्त होऊन पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी किटकनाशके प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात भरती केल्याने अनर्थ टळला. सुधीर वसाके हे बिहीटेकला येथे ग्रामसेवक म्हणून मागील वर्षभरापासून कार्यतर आहेत. त्यांचा मागील सहा महिन्यांपासून पगार काढण्यात आला नाही. त्यामुळे कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली होती. त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा करून पगार काढण्याची विनंती केली. मात्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पगार न काढल्याने त्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी येऊन विष प्राषण केले. त्यांनी विष प्राषण करताच पंचायत समितीत एकच खळबळ माजली. त्यांना तत्काळ ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.याबाबत कोरची पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डी. एम. वैरागडे यांना विचारणा केली असता, वसाके यांच्या विरोधात बिहीटेकला येथील नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना तेथून काढून पंचायत समितीच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र वसाके हे पंचायत समिती कार्यालयातसुद्धा रूजू झाले नाही. त्याचबरोबर विनापरवानगीने ते सहा महिन्यांपासून गैरहजर होते. त्यामुळे त्यांचे वेतन काढण्यात आले नाही, अशी दिली. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: March 22, 2016 02:10 IST