गडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत आज जिल्हाभर तालुका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के पंचायत समितीत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. धानोरा येथे ग्रामसेवकाच्या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष रमेश बोरकुटे, कोषाध्यक्ष पांडुरंग बुराडे, सचिव सजीव बोरकर यांनी केले.या आंदोलनात धानोरा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सहभागी झाले असून त्यांनी आपल्या चाव्या व शिक्के संवर्ग विकास अधिकारी यांना सुपूर्द केले आहे, अशी माहिती बोरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. तर चामोर्शी तालुका मुख्यालयात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, उपाध्यक्ष व्यंकटेश गंजीवार, महिला उपाध्यक्ष वंदना वाढई, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव पुरूषोत्तम बनपूरकर, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, विजय पत्रे, अभय कासर्लावार, निलकंठ धानोरकर, ज्योत्स्ना मेश्राम आदींसह अनेक ग्रामसेवक सहभागी झाले होते. यावेळी ग्रामसेवकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांना सादर केले. या निवेदनात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यात याव्या, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करण्यात यावी, कंत्राटी ग्रामसेवकाला सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून गृहीत धरण्यात यावे, २० ग्रामपंचायती मागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवासभत्ता पगारासोबत ३ हजार रूपये करण्यात यावा, सर्व संवर्गातील बदलीचे धोरण एक ठेवणे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्याने पेंशन योजनेचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. ११ जुलै रोजी मंत्रालयाजवळ धरणे दिले जाणार आहे, असे फुलझेले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
ग्रामसेवकांनी चाव्या केल्या बीडीओकडे सुपूर्द
By admin | Updated: July 2, 2014 23:18 IST