गडचिरोली : कोटगल (हेटी) येथील दलित समाजावर जातीय द्वेशातून सामाजिक व धार्मिक अन्याय करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कोटगल (हेटी) येथील दलित समाज बांधवांनी केली आहे. आमदार निधीतून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोटगल (हेटी) येथे समाज मंदिराचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू करण्यात आले. मात्र ग्रा.पं. सदस्य हिवराज डोंगरे, श्रीकृष्ण भोयर, ज्ञानेश्वर कांबळे, माया ठाकरे, वैशाली पोरेड्डीवार यांनी ठराव घेऊन तसेच बांधकामाविरोधात तक्रार करून समाज मंदिराचे बांधकाम बंद पाडले. दलित समाजासाठी विकासाचे केंद्र व जनसंपर्काचे केंद्र ठरणाऱ्या समाज मंदिराचे बांधकाम बंद पाळणे हे अयोग्य आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या सदस्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पुरषोत्तम बारसिंगे, जगन्नाथ मेश्राम, पुंडलिक वेस्कडे, किशोर बागडे यांनी केली आहे. संवैधानिक लोकशाही प्रणालीनुसार ग्रामपंचायतीच्या मार्फतीने गावाचा विकास घडविण्यासाठी जनमताने लोकप्रतिनिधी निवडून दिल्या जाते. मात्र सदर ग्रा.पं. सदस्यांनी अधिकाराचा दुरूपयोग करून जातीय द्वेशातून दलितांचे विकास कामे रोखत आहेत, अशा कृत्यास वेळीस आढा घालावा, अशीही मागणी दलित समाज बांधवांनी केली आहे. सदर ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अन्याय करणाऱ्या ग्रा.पं. सदस्यांवर कारवाई करा
By admin | Updated: July 3, 2014 23:33 IST