विकासात खोडा : नक्षल्यांकडून ग्रामपंचायतची जाळपोळभामरागड : तालुकास्थळापासून २० किमी अंतरावर असलेल्या नेलगुंडा ग्रामपंचायतीची १० वर्षांपूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधली नाही. त्यामुळे ग्रामसेवक स्वत:च्या घरी ग्रामपंचायतीचे दस्तावेज ठेवतो. परिणामी वेळेवर नागरिकांना दाखले मिळण्यास अडचण जात आहे. नेलगुंडा ग्रामपंचायतींतर्गत सभोवतालचे सात गावे समाविष्ट आहेत. नेलगुंडा गावात ४० ते ५० घरे आहेत. गावाची लोकसंख्या २०० च्या जवळपास आहे. मात्र या गावाला जाण्यासाठी अजुनपर्यंत रस्ता नाही. विजेची सोयसुध्दा नाही. केवळ गावामध्ये खांब उभारून ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यावर विजेचे तार नाहीत. मध्यवर्ती गाव असल्याने नेलगुंडा येथे गट ग्रामपंचायत आहे. नक्षल्यांनी सदर ग्रामपंचायतीची इमारत १० वर्षांपूर्वी जाळून खाक केली. यामध्ये संपूर्ण दस्तावेजही नष्ट झाले. त्यानंतर नवीन इमारत बांधणे आवश्यक असतानाही शासनाने या ठिकाणी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची इमारत होऊ शकली नाही. ग्रामपंचायतीला इमारत नसल्याने ग्रामसेवक स्वत:च्या घरी ग्रामपंचायतीचे दस्तावेज ठेवतात. सदर ग्रामसेवक भामरागड येथे राहून ये-जा करतात. पावसाळ्यात नेलगुंडा गावाचा संपर्क तुटत असल्याने पावसाळ्यादरम्यान नियमितपणे जाणे शक्य होत नाही. त्यादरम्यान एखाद्या दाखल्याची गरज पडल्यास नागरिकांची फार मोठी अडचण निर्माण होते. ग्रामपंचायती इमारत नसल्याने गावातील मंदिराच्या पटांगणात ग्रामसभा किंवा इतर सभांचे आयोजन करावे लागते. ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी नेलगुंडावासीयांनी केली आहे.
ग्रामपंचायत भवनाविनाच चालतो नेलगुंडा गावाचा कारभार
By admin | Updated: February 15, 2016 01:26 IST