लोकमत कार्यालयात चर्चा : रवींद्र दरेकर यांची मागणीगडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड येथे खानकाम खासगी कंपन्यांनी सुरू केले आहे. येथून लोह खनिजाची वाहतूक केली जात आहे. हा प्रकल्प उभा करताना एटापल्ली तालुक्यातील जनतेवर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी व प्रकल्प जिल्ह्यात उभा करण्याबाबत ठोस आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांनी केली. प्रदेश सचिव झाल्यानंतर गुरूवारी लोकमत कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी ते चर्चेदरम्यान बोलत होते. काँग्रेस सरकारच्या काळात या सर्व कंपन्यांना उत्खननाकरिता लीज देण्यात आली होती. विद्यमान भाजप सरकार गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. हे स्वागतार्ह असले तरी एटापल्ली तालुक्यातील सुशिक्षित बरोजगार व स्थानिक जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभा राहील, यासाठी उद्योजकांना आकृष्ट करण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे. उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ निर्माण करणे या बाबी सरकारलाच हाताळायच्या आहेत. वीज, पाणी, जमीन व पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी जिल्ह्यात हा उद्योग उभा झाला तरी प्रथम प्राधान्याने एटापल्ली तालुक्यातील जनतेला त्यात संधी दिली गेली पाहिजे. त्यांचा विचार पहिले झाला पाहिजे, अशी भूमिका दरेकर यांनी मांडली.
सूरजागडबाबत सरकारने ठोस आश्वासन द्यावे
By admin | Updated: April 23, 2016 01:19 IST