गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात १३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ४३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी सांगितले की, या दिक्षांत समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग उपस्थित राहणार आहेत. अतिथींच्या हस्ते हिवाळी परीक्षा २०१३ व उन्हाळी परीक्षा २०१४ मध्ये विविध अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या दोन हजार ८९३ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे. यावेळी सत्र २०१३-१४ मधील कला शाखेतील १६ गुणवंत, वाणिज्य १८, गृह विज्ञान तीन, समाज विज्ञान ४५, शिक्षणशास्त्र २०, विधी शाखेतील पाच, विज्ञान शाखेतील १९ तसेच अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील सात असे एकूण १३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या समारंभात एक हजार ७०४ विद्यार्थ्यांना पदवी, एक हजार १४५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, २४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका तसेच २० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशीही माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.
गोंडवानाच्या दीक्षांत समारंभात १३३ गुणवंतांचा होणार गौरव
By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST