गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी २०११ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विकासात्मक कामाचे ६८ कोटी रूपयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. नवीन सरकारकडूनही गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याने दोन्ही जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात शासनाच्या भूमिकेप्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यात आले. मात्र शासनाने गोंडवाना विद्यापीठाला अत्यल्प निधी सुरूवातीच्या काळात उपलब्ध करून दिला. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या विकासात मोठा अडसर निर्माण झाला. नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राची जागा गोंडवाना विद्यापीठाला देण्यात आली. या जागेचे हस्तांतरण विद्यापीठाने स्वत:च करवून घेतले. आपल्या उत्पन्नातून या भागात इमारतीचे बांधकामही केले. शासनाकडे ६८ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र शासनाने अद्यापही या प्रस्तावावर काहीही कारवाई केलेली नाही. ४० एकर जागेचा प्रस्ताव वन विभागाने केंद्र सरकारकडे रवाना केला आहे. त्याला वन व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी लागणार आहे. एकूणच गोंडवाना विद्यापीठाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे.
गोंडवाना विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
By admin | Updated: February 19, 2015 01:36 IST