एटापल्लीत उपोषण : शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनएटापल्ली : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १९९२ ते २००० या कालावधीत नियुक्त झालेल्या अप्रशिक्षीत शिक्षकांच्या वेतनवाढी तत्काळ अदा करण्यात याव्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा एटापल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारपासून एटापल्ली पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले. या उपोषण स्थळाला माजी आमदार दीपक आत्राम यांनी ३१ मार्च रोजी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.दिपक आत्राम यांनी आंदोलकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. आंदोलनादरम्यान ३० मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी एन. डी. माटूरकर यांनी उपोषण स्थळाला भेट देवून आंदोलकांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान १५ एप्रिल पर्यंत वेतन निश्चिती करून वेतनवाढ देण्यात येईल असे लिखीत आश्वासन दिले. त्याचबरोबर आंदोलन मागे न घेतल्यास वेतन कपातीची कारवाई करण्यात येईल, अशी धमकीसुद्धा दिली असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गटशिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाल्यापासून शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही असाही आरोप केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संघटनेने निवेदन दिले असून गटशिक्षणाधिकारी माटूरकर व ज्येष्ठ सहाय्यक आर. आर.गुप्ता यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी केली आहे.
उपोषण मंडपाला आत्रामांची भेट
By admin | Updated: April 1, 2016 01:54 IST