लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ‘नेमेचि येताे पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळा आला की, गडचिराेली शहरातील रस्त्यांची दैनावस्था हाेते. मार्गांवरील खड्ड्यांचा आकार वाढताे. त्यात पावसाचे पाणी साचते. डबक्यातील घाण पाणी वाहनधारकांच्या अंगावर उडते. हे चित्र गडचिराेली शहरातील काही भागात दरवर्षीचे झाले आहे. पण त्या भागातील नगरसेवकांसह नगरपालिका प्रशासन याची दखल घेण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष करून तलावाकडून जाणारा गाेकुलनगर बायपास मार्ग, विसापूर मार्ग आणि शहरातील सर्वोदय वॉर्डमधील प्रमुख रस्त्यांचा यात समावेश आहे.
गडचिराेली शहरातील काही वर्दळीच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गाेकुलनगर, सर्वाेदय वाॅर्ड, चनकाईनगर, स्नेहनगर, फुले वाॅर्ड, गांधी वाॅर्ड व इतर अनेक भागात रस्ते उखडले असल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाॅक्स ....
विसापूर मार्गाचा प्रवास झाला खडतर
गडचिराेली नगरपालिकेच्या हद्दीत विसापूर वाॅर्डाचा समावेश आहे. विसापूर, काेटगल तसेच काॅम्प्लेक्सकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जाताे. शिवाय या मार्गावरून एलआयसी, विविध शासकीय कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालयांत जाता येते. त्यामुळे या मार्गावर वाहनधारक व सायकलस्वारांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर माेठमाेठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचले आहे. अर्धा फूट खाेल व दीड ते दाेन फूट रुंदीच्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा प्रवास खडतर बनला आहे.
काेट ......
आमचे नगरसेवक तर झोपले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावे? पण पाऊस आल्यानंतर गुजरी ते फुले वॉर्डकडे जाणाऱ्या एकाच रस्त्यावरून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी पैदल किंवा दुचाकीने जाऊन दाखवावे. सामान्य माणसांना काय त्रास होतो ते कळेल.
- प्रज्वल दुर्गे, नागरिक
काेट ....
विसापूर ते गडचिराेली या मार्गाचा हजाराे नागरिकांशी संबंध आहे. गडचिराेली शहरात येण्यासाठी याच मार्गाचा आम्ही वापर करताे. मात्र दुरुस्ती करूनही अल्पावधीत आठवडी बाजाराजवळ या मार्गावर माेठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे पेट्राेल अधिक लागत आहे.
- गाेलू तांगळे, नागरिक
काेट .....
तलावाकडून गाेकुलनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने आवागमन धाेक्याचे झाले आहे. खड्ड्यांमुळे माझ्यासह अनेकांना पाठदुखीचा त्रास वाढला आहे. खड्ड्यातून झटके लागत असल्याने त्रास अधिक हाेत आहे.
- मनाेहर गेडाम, नागरिक
बाॅक्स ......
भातगिरणीकडील रस्ता खड्डेमय
आरमाेरी मार्गावरून भातगिरणीकडून ग्रामसेवक भवनापासून धानाेरा मार्गाला जाेडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या भागातील अनेक लाेक सदर मार्गाचा वापर करतात. मात्र या रस्त्याची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. माेठमाेठे खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. येथे प्रशासनाच्या वतीने छाेटा पूल निर्मितीचे काम करण्यात आले. मात्र नियाेजन नसल्याने सदर मार्गावर आता चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करत अवागमन करावे लागत आहे.