गडचिरोली : शहरातील आठवडी बाजार चौकातून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठ खड्डे निर्माण झाले आहे. परिणामी घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. रस्त्याची पुर्णत: दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली-विसापूर हा डांबरीकरण मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. सदर मार्ग पूर्वी खडीकरणाचा होता. त्यानंतर जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण झाल्यापासून या मार्गाची एकदाही पक्की दुरूस्ती करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरूस्तीबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन या मार्गावर मुरूम टाकण्याचा प्रकार संबंधित विभागाने केला होता. मात्र जोरदार पाऊस झाल्याने या मार्गावरील खड्ड्यातील मुरूम पावसात वाहून गेला. जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल, विसापूर तसेच कॉम्प्लेक्स परिसरातील शासकीय कार्यालयाकडे जाण्यासाठी नागरिक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर दिवसभर दुचाकी वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर भंगार वस्तूंचा धरमकाटा आहे. त्यामुळे येथे जड वाहनांचे नेहमी आवागमन असते.या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या मार्गावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या मार्गावर मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करू नये, विभागाने या मार्गाचे चांगल्या प्रकारे डांबरीकरण करावे, अशी मागणी विसापूर व कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गडचिरोली-विसापूर मार्ग खड्ड्यात
By admin | Updated: October 4, 2015 02:18 IST