गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. आरोपीने आधी तरुणाच्या डोळ्यात मिरचीचे तिखट टाकले आणि त्यानंतर फर्निचर बनवण्याच्या धारदार शस्त्राने छातीवर सपासप वार करून त्याचा जागीच बळी घेतला. सचिन रामचंद्र कोलूरवार (३५, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) असे मृतकाचे तर महेश महादेव बुरांडे (३४, रा. लांझेडा वॉर्ड, गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोना काळात गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या पुणे येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सागवानाचे फर्निचर बनवण्यासाठी संशयित आरोपी महेश याला २ लाख रुपये दिले होते. मात्र, पाच-सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही महेशने फर्निचर बनवून दिले नव्हते. या संदर्भात वारंवार विचारणा करण्यात येत होती. आठ दिवसांपूर्वी सचिन कोलूरवार व त्याचा एक साथीदार त्या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने महेशच्या घरी गेले होते. कोणत्याही परिस्थितीत फर्निचर तयार ठेवण्याचा कडक इशारा त्यांनी दिला होता.
तिखटाचा वापर अन् शस्त्राने वार
सोमवारी दुपारी सचिन व त्याचा मित्र वाहन घेऊन फर्निचर नेण्यासाठी पुन्हा महेशच्या घरी पोहोचले. मात्र, काही फर्निचर अद्याप तयार नसल्याचे पाहून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या महेशने अचानक सचिनच्या डोळ्यांत मिरचीचे तिखट फेकले. सचिनला काही समजण्यापूर्वीच महेशने फर्निचर बनवण्याच्या धारदार वाकसाने त्याच्या छातीवर भीषण वार केले. या हल्ल्यात सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी
भरदिवसा शहरात खुनाची घटना घडल्याने लांझेडा वॉर्डात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
आरोपी फरार, शोध सुरू
आरोपी महेश बुरांडे हा घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, या घटनेने गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे.
तीन वर्षांची चिमुकली पितृप्रेमाला पारखी
दरम्यान, सचिन कोलूरवार याचा चामोर्शी मार्गावरील संविधान चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पानठेला होता. सहा वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला साडेतीन वर्षांची एक मुलगी आहे. त्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिमुकली पितृप्रेमाला पारखी झाली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला तेव्हा कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते.
Web Summary : In Gadchiroli, a furniture dispute led to murder. A man attacked another with pepper spray and a sharp weapon, resulting in immediate death. The accused is absconding.
Web Summary : गढ़चिरोली में फर्नीचर विवाद में एक युवक की हत्या कर दी गई। आरोपी ने मिर्च स्प्रे और धारदार हथियार से हमला किया, जिससे मौके पर ही मौत हो गई। आरोपी फरार है।