गोपाल लाजूरकर, गडचिरोलीशिकारीच्या शोधात गावात आलेल्या बिबट्याने एका घरात प्रवेश केला. बिबट घरात शिरल्यानंतर लोकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि दुपारी चार वाजेपासून रेस्क्यू मोहीम सुरू झाली. तब्बल दहा तास रेस्क्यू पथकाला कसरत करावी लागली. मध्यरात्री २ वाजता बिबट्याला डॉट देऊन जेरबंद करण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा थरार आरमोरी तालुक्याच्या डोंगरसावंगी येथे गुरूवारी (२२ मे) रात्री घडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरमोरी तालुक्यातील डोंगरसांवंगी हे गाव डोंगराला लागून आहे. या गावालगत असलेल्या पहाडीवर नेहमी बिबट्यांचा वावर असतो. मागील पाच दिवसांपासून शिकारीच्या शोधात बिबट्या गावात प्रवेश करीत आहे. गावातील दोन श्वानांची शिकार बिबट्याने केली होती.
तीन दिवसांपूर्वी गावातील एका घरात बांधलेल्या शेळीवर रात्री ९ वाजता हल्ला केला होता. लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट पळून गेला. शिकारीची चटक लागल्याने तो गावात रात्री प्रवेश करीत होता. मात्र, गुरूवार (२२ मे) दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट पहाडीवरून उतरून गावात प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आले.
लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चक्क डोंगरालगत असलेल्या चंद्रभागा पुरुषोत्तम श्रीरामे यांच्या घरात आश्रय घेतला. घरातील एका धाब्यावर चढून तिथे एका कोपऱ्यात दडून बसला होता.
लोकांचा जमाव पांगवण्यासाठी बोलावले पोलीस
बिबट्याला पकडण्यासाठी गडचिरोलीवरून रेस्क्यू टीमला बोलविण्यात आले. मात्र लोकांचा जमाव वाढू लागल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
सायंकाळी सात वाजेपासून रेस्क्यूला सुरुवात झाली आणि तब्बल सात तासानंतर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. जेरबंद केल्यानंतर रात्रीच बिबट्याला वडसा येथे नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
दरवाजे, खिडक्या केल्या बंद
बिबट्या दडून बसलेल्या घराच्या धााब्यावरील दरवाजे खिडक्या जाळी लावून बंद करण्यात आल्या. सायंकाळी सात वाजेपासून रेस्क्यूला सुरूवात झाली आणि तब्बल सात तासानंतर बिबट्याला डॉट देऊन जेरबंद करण्यात आले.
यावेळी वडसाचे उपवनसंरक्षक बी. वरून, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर, क्षेत्र सहायक अरुण गेडाम, वनरक्षक विकास शिवणकर, नितीन भोयर, तसेच कर्मचारी उपस्थित होते.