गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोलीचा वेगाने विकास होत आहे, उद्योग येत आहेत, आदिवासींचे जीवनमान बदलत आहे; पण काही लोकांच्या डोळ्यांत ही प्रगती खुपत आहे. गडचिरोलीतील विकासाबाबत लोकांना भ्रमित करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता त्यातील दोघे कोलकाता, तर दोघे बंगळुरूचे असल्याचे समोर आले आणि त्यांना विदेशातून फंडिंग होत आहे, असा दावा मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. अशा प्रकारे संविधान विरोधी काम करणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.कोनसरी (ता. चामोर्शी) येथे लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लि.चा ४.५ एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प, १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय, सीबीएसई शाळा, तसेच सोमनपल्ली येथील कर्मचारी वसाहतीचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नक्षलवाद्यांनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आणखी १५ विद्यार्थी जाणार ऑस्ट्रेलियात
मायनिंग क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी गडचिरोलीतून १५ विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने कर्टिन विद्यापीठाशी करार केलेला असून, मागील वर्षी आठ विद्यार्थी ऑस्ट्रेलियात गेले होते.
बंदुकीची हिंसा संपतेय, पण शहरी नक्षलवादाचा धोका अजूनही वाढताच
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जंगलातील बंदुकीचा नक्षलवाद संपत असला तरी शहरी नक्षलवादाचा धोका वाढत आहे. गेल्यावेळी पायाभरणी कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी गरीब आदिवासींना मारले, त्यांच्या जमिनी बळकावल्या, त्यांच्यावर अन्याय केला अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून प्रपोगंडा निर्माण करण्यात आला, यामागे शहरी नक्षलवादाशी संबंधित लोक होते, हा धाेका ओळखा असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
१४ हजार आदिवासींना मिळाला रोजगारमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१५ मध्ये जिल्ह्यात लोहखनिज उत्खननचे काम हाती घेतले. नक्षलवाद्यांचा प्रभाव, प्रतिकूल भौगोलिक स्थितीमध्येही कंपनीने हिमतीने पाऊल ठेवले. त्यामुळे आज आदिवासींचे जीवनमान उंचावत आहे. जल, जंगल, जमीन अबाधित राखून विकास करायचा, इथल्या खनिजावर इथेच प्रक्रिया करून स्वस्त आणि दर्जेदार पोलाद निर्माण करायचे व रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यायचे, अशी अट आम्ही घातली होती. त्यानुसार कंपनीने झपाट्याने उद्योगाचा विस्तार केला. यातून १४ हजार लोकांना काम मिळाले. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. परिणय फुके, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पद्मश्री तुलसी मुंडा, व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आदी यावेळी उपस्थित होते.