पोलिसात तक्रार दाखल : माजी नगराध्यक्ष व न.प. कर्मचाऱ्यामध्ये वाददेसाईगंज : माजी नगराध्यक्ष व न.प. कर्मचारी यांच्यात आज मुख्याधिकाऱ्याच्या कक्षात फ्रीस्टाईल वाद झाल्याची घटना घडली. या घटनेत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख यांच्या हाताला जखम झाली आहे. या घटनेनंतर दोघानीही एकमेकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी हे प्रकरण सध्या चौकशीसाठी ठेवले असल्याची माहिती आहे. माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी हे आज मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात बसले होते. शहरातील एका अतिक्रमण हटविण्याच्या प्रकरणावरून मोटवानी व अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अशोक माडावार यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसननंतर हाणामारीवर पोहोचले. याच वादात मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील काच फूटला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना बोलाविण्यात आले. माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर माडावार यांनीही तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेसंदर्भात माहिती देताना जेसा मोटवानी यांनी सांगितले की, गुरूवारी नगर परिषदेत मुख्याधिकाऱ्यांकडे आपण गेलो होतो. त्यांच्याशी चर्चा सुरू असताना अशोक माडावार मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात आले व जया सहारेला माझ्याविरूध्द भडकवून गुन्हा नोंदविला आहे. याबाबीवरूनच वाद उसळला व माडावार यांनीच टेबलावरची काच फोडली व आपण त्यांना जखमी केले, अशी तक्रार त्यांनी दिली. माडावार यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही मोटवानी यांनी केली आहे. या घटनेसंदर्भात अशोक माडावार यांनी सांगितले की, मोटवानी यांनी जया सहारे याला महिलेला आपल्या विरूध्द तक्रार करायला लावली. शासकीय आदेशानुसारच आपणही कारवाई केली होती. मोटवानी हे नगर परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे काम नेहमीच करतात. व्यक्तीगत बदनामीही त्यांनी केली, असे सांगितले. (वार्ताहर)
देसाईगंज पालिकेत ‘फ्रीस्टाईल’
By admin | Updated: July 24, 2014 23:50 IST