लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करून आपल्याला शांती व विकास आवश्यक असल्याचे आवाहन नक्षल्यांना केले.नक्षल्यांमुळे विकास रखडला असल्याची बाब दिवसेंदिवस नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या लक्षात येण्यास सुरूवात झाली आहे. बंदुकीच्या जोरावर आजपर्यंत नक्षल्यांनी दुर्गम भागातील नागरिकांचा त्यांना पाहिजे तसा वापर करून घेतला. मात्र आता प्रगती करायची असेल तर नक्षलवाद नष्ट होणे आवश्यक आहे. ही बाब गावकऱ्यांना समजली आहे. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा या गावातील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत गावाच्या हद्दित असलेले नक्षल स्मारक तोडण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याची तारीख यासाठी ठरविण्यात आली.नियोजनाप्रमाणे गावकऱ्यांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस्त केले. नक्षल स्मारक उद्ध्वस्त केल्यानंतर यापुढे नक्षल्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जाणार नाही, अशी शपथ घेतली.विशेष म्हणजे, नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा, पेनगुंडा ही गावे नक्षल्यांचा गड मानली जात होती. मात्र याच गावातील नागरिकांनी एकत्र येत नक्षल स्मारक तोडण्याच्या माध्यमातून नक्षल चळवळीलाच खुले आव्हान दिले आहे. एकाच दिवशी चार नक्षल स्मारके खुलेआम तोडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीत गावकऱ्यांनी उद्ध्वस्त केली चार नक्षल स्मारके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 10:21 IST
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करून आपल्याला शांती व विकास आवश्यक असल्याचे आवाहन नक्षल्यांना केले.
गडचिरोलीत गावकऱ्यांनी उद्ध्वस्त केली चार नक्षल स्मारके
ठळक मुद्देगुढीपाडव्याच्या दिवशी उभारली निर्भयतेची गुढीनेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांचे धाडस