गडचिरोली : अवैधरीत्या सुगंधित तंबाखू व्यवसाय चालू ठेवण्यासाठी व तक्रारकर्त्या किराणा दुकानदारावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या कामासाठी १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गांगलवाड (२७) याला एसीबी पथकाने शनिवारी अटक केली. रविवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला २ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडचिरोलीच्या एसीबीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, एम. एस. टेकाम यांनी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगलवार याला शनिवारी अटक करून त्याचेवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक गांगलवाड याने एसीबीचे वाईस रेकार्डर घेऊन पसार झाला व त्याने पुरावा नष्ट केला होता, अशी माहिती एसीबी पथकाने दिली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी गांगलवाड याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती एसबीसीचे दामदेव मंडलवार यांनी लोकमतला दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास चार दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Updated: August 31, 2015 01:17 IST