आमदारांची माहिती : जिल्हाधिकारी, व्यवस्थापकांशी चर्चाकुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी व महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. सदर चर्चा यशस्वी ठरल्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव, गेवर्धा, आंधळी व कुरखेडा हे चार धान खरेदी केंद्र २७ डिसेंबर शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार क्रिष्णा गजबे यांनी दिली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी शासनाच्या जाचक अटीमुळे धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी प्रचंड पायपीट होत होती. परिणामी खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती. शेतकऱ्यांच्या या सर्व अडचणी लक्षात घेऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी व आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक आंबटकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगरसेवक राजू जेठाणी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, कुरखेडाचे नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, युसूफभाई शेख उपस्थित होते.
२७ पासून चार केंद्र सुरू होणार
By admin | Updated: November 27, 2015 01:50 IST