आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागांत अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी हाेत आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय, त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी.
खुटगावात निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे शेण पडून राहते.
कळमटाेला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिराेली : तालुक्यातील दिभना-कळमटाेला मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची दिशाभूल हाेत आहे. या मार्गावरून दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.