गडचिरोली : चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान हवाईपट्टीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेसाठी ३० कोटी रूपये राज्य शासनाला वनविभागाला नक्त मालमत्ता मुल्य (एनपीव्ही रक्कम) द्यावयाचे होते. मात्र सदर रक्कम राज्य शासनाने दिली नाही. त्यामुळे हवाईपट्टीसाठी जमीन उपलब्ध झाली नाही. २००९ मध्ये राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचा मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमुला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहिती दिली होती. सदर जागा ही गडचिरोली बिटातील कक्ष क्रमांक १७१, १७२, गुरवळा बिटातील कक्ष क्रमांक १६५, चांदाळा बिटातील कक्ष क्रमांक १७४, बोदली बिटातील कक्ष क्रमांक १७३ मध्ये ५०० हेक्टर राहणार होती. सदर जागेचे मूल्य ३० कोटी रूपये निश्चित करण्यात आले होते. यासाठी शासनाला वनविभागाकडे तेवढा पैसा भरावा लागणार होता. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाबाबत काहीही प्रगती होऊ शकली नाही, अशी खंत गडचिरोलीकर करीत आहे.
हवाईपट्टीच्या जागेसाठी वन विभागाला हवे ३० कोटी
By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST