स्वतंत्र लाईनमन देण्याची मागणी : सरपंचांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनकमलापूर : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते कमलापूर वीज वाहिनीमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात १५ ते २० गावे येत असल्याने या परिसरासाठी स्वतंत्र लाईनमन नेमण्यात यावा व त्याला कमलापूर येथे राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी कमलापूर परिसरातील सरपंचांनी वीज विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कमलापूर परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी व्याप्त आहेत. जंगलातूनच रस्त्याच्या बाजुने विद्युत खांब गाडून गावांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र वादळवारा झाल्यानंतर एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडित होतो किंवा झाडांच्या फांद्यांमुळे स्पार्र्किं ग होऊनही वीज पुरवठा खंडित होतो. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किमान ४ ते ५ दिवस सुरळीत होत नाही. तेवढे दिवस नागरिकांना अंधारातच काढावे लागते. पावसाळ्यात विजेची समस्या आणखी गंभीर होते. वीज समस्येमुळे कमलापूर परिसरातील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत वीज विभागाकडे तक्रारही करण्यात आले आहेत. मात्र वीज विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कमलापूर परिसरातील सरपंचांनी एकत्र येऊन वीज समस्येबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर या परिसरातील वीज समस्येबाबत चर्चा केली. चर्चेदरम्यान कमलापूर येथे १५ दिवसांतून एकदा शाखा अभियंत्यांना समस्या सोडविण्यासाठी पाठवावे, कमलापूर परिसरासाठी स्वतंत्र लाईनमन द्यावा, विद्युत रोहित्र दुरूस्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता ए. एस. परांजपे यांना निवेदन देताना सरपंच रणजीता मडावी यांच्यासह संतोष ताटीकुंडावार, महेश मडावी, संदीप रेपालवार, महेश अडीचेर्लावार, श्रीधर दुग्गीरालापाटी, लक्ष्मीनारायण रापेल्ली, प्रफुल भट, संतोष बोम्मावार यांच्यासह कमलापूर येथील इतरही नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
कमलापूर परिसरातील वीज समस्या सोडवा
By admin | Updated: September 7, 2016 02:18 IST