जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : चामोर्शीत भाजप सदस्यांवर दणका; पक्षादेश झुगारणे पडले महागातचामोर्शी : स्थानिक पंचायत समितीचे उपसभापती केशवराव मसाजी भांडेकर यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाच्या ठरावावर पक्षादेश झुगारून भाजपाच्या पाच सदस्यांनी मतदान केले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे भांडेकर यांनी याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी निकाल जाहीर करून भाजपाच्या पाच पं. स. सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८७ व कलम ६, सहकलम ३ (१) (ब) नुसार रद्द केल्याचे घोषित केले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पं. स. सदस्य रद्द झालेल्या सदस्यांमध्ये रेवनाथ सुखदेव कुसराम, मनीषा हरेश दुधबावरे, रंजना नीलकंठ कुमरे, मनमोहन रामय्या बंडावार, मीनाक्षी देवगडे यांचा समावेश आहे. चामोर्शी पंचायत समितीवर भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. अडीच वर्षाच्या वर्षाच्या कालावधीनंतर केशवराव भांडेकर यांची उपसभापती पदावर निवड झाली. सप्टेंबर २०१४ मध्ये भांडेकर हे पं. स. च्या उपसभापती पदावर विराजमान झाले. दरम्यान त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना हाताशी घेऊन उपसभापती भांडेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. केवळ आठ महिन्यांच्या अंतरावर १० जून २०१५ रोजी उपसभापती भांडेकर यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. भाजपाने व्हिप जाहीर करून पक्षाच्या सर्व सदस्यांना अविश्वास प्रस्ताव ठरावाच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले. मात्र भाजपाचे पं. स. सदस्य रेवनाथ सुखदेव कुसराम, मनीषा हरेश दुधबावरे, रंजना नीलकंठ कुमरे, मनमोहन रामय्या बंडावार, मीनाक्षी देवगडे या पाच सदस्यांनी पक्षादेश झुगारून ठरावाच्या बाजूने मतदान करून उपसभापती भांडेकर यांना पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. यामुळे पं. स. उपसभापती केशवराव भांडेकर पक्षादेश झुगारणाऱ्या पाच पं. स. सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशा मागणीची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी ९ नोव्हेंबर रोजी सोमवारी या याचिकेवर निकाल घोषित करून पक्षादेश झुगारलेल्या पाच पं. स. सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द केले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची चामोर्शी पंचायत समितीला पत्र पाठविले आहे. भाजपाच्या पाच सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्यामुळे पं. स. च्या राजकारणात भाजपाची गोची झाली असून पुढे होणाऱ्या राजकीय घडामोडीकडे नेत्यांसह लोकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच पं.स. सदस्यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Updated: November 11, 2015 00:45 IST