शॉर्टसर्किटने : पाच लाखांचे नुकसानआरमोरी : येथील बुध्द विहाराजवळील एका जनरल स्टोअर्सच्या दुकानाला गुरूवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत दुकान मालकाचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. आरमोरी येथील बुध्द विहाराच्या चाळीत रवी मेश्राम यांच्या मालकीचे कनिष्का गिफ्ट जनरल स्टोअर्स, बुक डेपो व इलेक्ट्रीकल्सचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरूवारी मेश्राम हे दुकान बंद करून सायंकाळी घरी गेले. त्यानंतर रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे दुकानाला आग लागली. आग लागल्यानंतर धुराची लोट बाहेर येऊ लागले. आग लागल्याचे लक्षात येताच नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व उत्सवातील भाविकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग विझविण्यासाठी अग्नीशमन वाहन बोलविण्यात आले. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आणण्यात नागरिकांना यश मिळाले. या आगीत दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. आग लागल्यामुळे दुकानमालक मेश्राम यांचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जळालेल्या दुकानाचा पंचनामा केला. यापूर्वी आरमोरीत शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. (वार्ताहर)
आरमोरीत जनरल स्टोअर्स दुकानाला आग
By admin | Updated: October 24, 2015 00:54 IST