गुड्डीगुडम/आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्राम पंचायतीच्या हद्दीतील झिमेला पाेचमार्गावर माेठा नाला पडताे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक प्रभावित हाेते. नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने रहीदारीची समस्या आणखीच बिकट झाली. या समस्येची दखल घेत जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने झिमेला नजीकच्या नाल्यावर १ काेटी रूपये किमतीच्या माेठ्या उंच पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
झिमेला हा गाव सिरोंचा ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरून तीन किमी अंतरावर असून या गावात पोहचण्यासाठी लहान मोठे दोन तीन नाले आहेत. नाल्यावर पावसाळ्यात पाणी राहत असल्याने या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो. येथील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी व शालेय कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या नाल्यावरील छोटासा रपटा वाहून गेला. तेव्हापासून या मार्गावरील वाहतुकीची समस्या बिकट बनली. गावाच्या बाहेर व गावाकडे ये-जा कसे करावे, असा प्रश्न ग्रामस्थांसमाेर निर्माण झाला. दरम्यान ही बाब जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचवेळी नाल्यावर पाेहाेचून पाहणी केली. तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्त करण्यात आला. या ठिकाणी लवकरच मोठा पूल मंजूर करून रहदारीची समस्या मार्गी लावणार, असे आश्वासन कंकडालवार यांनी त्यावेळी ग्रामस्थांना दिले हाेते. दरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून झिमेला गावानजीकच्या नाल्यावर पुलाचे काम मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते १३ मार्च राेजी करण्यात आले.
याप्रसंगी जि. प. सदस्य सुनीता कुसनाके, अजय नैताम, पं. स. सदस्य योगीता मोहूर्ले, उपसरपंच प्रफुल नागुलवार, ग्रा. पं. सदस्य दिवाकर गावडे, श्रीकांत पेंदाम, गंगाराम आत्राम, नागेश शिरलावार, धर्मराज पोरतेट, प्रशांत गोडशेलवार, श्रीनिवास राऊत, हरीश गावडे, संदीप दुर्गे, जगनाथ मडावी, महेश मडावी, शशिकला पेंदाम, रमेश कोरेत, महेश सिडाम हजर हाेते.
बाॅक्स ....
ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद
‘नेमेची येताे पावसाळा’ या म्हणीप्रमाणे दरवर्षीच्या पावसाळ्यात झिमेलावासीयांची रहदारीची समस्या प्रचंड बिकट हाेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची पुलाची मागणी कायम हाेती. अनेक लाेकप्रतिनिधी व अधिकारी येऊन पाहणी करीत हाेते. मात्र कार्यवाही हाेत नव्हती. मात्र आता जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रयत्नाने पुलाचे काम सुरू झाल्याने लाेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.