लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मितीबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने १३ फेब्रुवारीला मंजुरी दिली. यात येथील स्त्री रुग्णालयाचा समावेश आहे. इमारत बांधकाम होऊन एक वर्ष उलटूनही पदभरतीला मंजुरी मिळाली नव्हती, त्यामुळे आरोग्य सेवेस अडसर होत होता; परंतु आता पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथील स्त्री रुग्णालयाकरिता एकूण ४२ नियमित पदे निर्माण करून त्याला मान्यता दिली आहे. तसेच बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाची एकूण ५५ पदे निर्मित केली, अशा एकूण ९७ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
नियमित पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी स्त्री व प्रसूती रोग, वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण प्रत्येकी एक, क्ष किरण तंत्रज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ प्रत्येकी दोन अशी एकूण २० नियमित पदे असून, बाह्ययंत्रणेकडून भरावयाची अधिपरिचारिका १२ पदे, बालरोग परिचारिका ५ इत्यादी एकूण ५५ पदे समाविष्ट आहेत. अहेरी स्त्री रुग्णालयातील पदभरतीच्या मंजुरीमुळे रुग्णसेवा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
ताडगाव, जारावंडी येथील बांधकाम लवकरचदुर्गम ताडगाव (ता. भामरागड) व जारावंडी (ता. एटापल्ली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत. त्यांच्या बांधकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे या भागातील रूग्णांनाही दिलासा मिळेल.
"दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये याकरिता स्त्री रुग्णालयाची मागणी केली होती. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता पदभरतीला मंजुरी मिळाली ही मोठी उपलब्धी आहे. रेफरचे प्रमाण कमी होऊन गर्भवतींना उपचार सोयीचे होतील."- धर्मरावबाबा आत्राम, आमदार