शिक्षकांच्या विभागीय अधिवेशनाचे उद्घाटन : उल्हास फडके यांची खंत; शिक्षकांची लक्षणीय उपस्थितीगडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार व्हावा, राज्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, हे या संकल्पनेचे मुख्य उद्दिष्टे आहे. या संकल्पनेमुळे शाळेत दाखल विद्यार्थ्यांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. मात्र शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील संस्कृती लॉनमध्ये शिक्षकांच्या विभागीय अधिवेशनाचे उद्घाटन थाटात करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन गोपाल पुरोहित यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर येथील डायटचे प्राचार्य शरदचंद्र ठेंगरी, प्रभूजी देशपांडे, पांडुरंग काकडे, योगेश बन, गडचिरोली डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे, डायटचे प्रा. विनीत मत्ते, शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे सहकार्यवाह सत्यम चकीनारप आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. फडके म्हणाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद केवळ शिक्षकांच्या मागण्यांवरच लढा उभारत नाही. तर यापुढेही जाऊन विद्यार्थी कल्याण व हक्कासाठी संघर्ष करीत आहे. शासनाच्या नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व सदस्य नेहमीच प्रयत्नशील असतात. शिक्षणाची परिणामकारता वाढली पाहिजे, ज्ञानाची पूंजी उपयुक्त असावी, असेही ते यावेळी म्हणाले. ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धतीची अंमलबजावणी होत असून विद्यार्थी व ज्ञानात शिक्षक केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावित आहेत. शिक्षण प्रक्रियेत येणारे नवनवे प्रवाह शिक्षकांनी आत्मसात करावे, असे आवाहनही डॉ. फडके यांनी यावेळी केले. मोहन पुरोहित म्हणाले, भारत देशाच्या भावी पिढीचे भविष्य शिक्षकांच्या हातात आहे. राष्ट्र विकासात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षकांनी विद्यार्थी व राष्ट्रहीत कल्याणाचे कार्य निरंतर सुरू ठेवावे, तसेच चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कोमेरवार, संचालन जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर यांनी केले तर आभार प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी रमेश बोरकर, चंद्रशेखर निकुरे, दिलीप दिवटे, श्यामराव सोनुले, जगमोहन चंदेल, माया हेमके, वासुदेव तडसे, प्रमोद कोडापे, विलास म्हस्के, यशवंत शेंडे, रमेश बोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व आश्रमशाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आकडेवारी वाढली मात्र गुणवत्तेकडे दुर्लक्ष
By admin | Updated: January 31, 2016 01:29 IST