अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी केले स्वागत : नवी इमारत बांधण्याची मागणीसिरोंचा : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांनी सिरोंचा येथील बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाला सोमवारी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रकल्प अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या प्रकाराविषयी सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सभापती जनगाम यांचे अंगणवाडी पर्यवेक्षीका व सेविकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रकल्प कार्यालयात आकार प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती. या कार्यशाळेला उपस्थित सर्व पर्यवेक्षीका व अंगणवाडी सेविकांनी सभापतीसमोर रिक्त पदे भरण्याबाबत तसेच नवीन प्रकल्प कार्यालय इमारत बांधकाम करण्यात यावे, यासह विविध समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे जनगाम म्हणाल्या. नवीन प्रकल्प कार्यालय इमारत बांधकामाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, माजी सरपंच रवी सल्लम, पं.स. सदस्य शकुंतला जोडे, ग्रा.पं.सदस्य अजय आत्राम, श्रीनिवास गोडम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
सभापतींच्या भेटीत महिला बाल विकास अधिकारी आढळले गैरहजर
By admin | Updated: April 11, 2017 00:57 IST