गडचिरोली : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची लागण होऊ नये व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत, नगर पालिका प्रशासनाने तशा उपाययोजनाही आखल्या आहेत. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या बस स्थानक, रेल्वे स्थानक व रुग्णालय येथे पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने साथीच्या आजारांची भीती बळावली आहे. पावसाळ्यात विविध आजारांची लागण होत असते. यात साथीचा आजार हा पाण्याच्या माध्यमातून होत असतो. या आजारावर खबरदारी म्हणून तशा उपाययोजनाही आरोग्य विभागाने आखल्या आहेत. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु सर्वाधिक गर्दीचे सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानक, रेल्वे स्थानक, व रुग्णालयात शुध्द पिण्याचे पाणी मिळणे कठीणच झाले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र टाकीची नियमीत सफाई केली जात नाही. टाक्या स्वच्छ ठेवल्या जात नाही. पाणी शुध्द करण्यासाठी केलेल्या उपाययोजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे कुचकामी ठरत आहेत. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी घाण पसरली आहे. रुग्णालयाच्या छतावर पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. परंतु या टाक्यांची नियमीत स्वच्छता केली जात नाही. तर रूग्णालय परिसरात असलेल्या सिमेंटच्या टाक्याजवळही घाण पसरली आहे. येथील घाण स्वच्छ करण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. येथील एसटी आगारातही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. मात्र येथे सुध्दा शुध्द पाणी प्यायला मिळेल याची शाश्वती नाही. हीच स्थिती देसाईगंज येथील रेल्वे स्थानकाची आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या देसाईगंज स्थानकावर पाण्यासाठी प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी झाल्या आहेत. दिवसभरात या स्थानकावरुन हजारो प्रवाशी जात असतात. येथे असलेल्या पाण्याच्या टाक्या इंग्रजकाळात बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे टाक्यांची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
दूषित पाण्यामुळे आजारांची भीती
By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST