आश्वासन: आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागेगडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन निकाली काढण्यात यावे या मागणीसाठी मागील चार दिवसांपूर्वी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. मात्र पाच जुलैपर्यंत वेतन निकाली न काढल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला.सेवार्थ प्रणालीद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन जि. प. मार्फत काढले जात आहे. परंतु आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड न केल्याने मार्च पासूनचे वेतन प्रलंबित होते. सेवार्थ प्रणालीनुसार वेतन काढणे कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे करिता २३ जूनपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन जि. प. समोर सुरू करण्यात आले. २४ जून रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, डॉ. चौधरी, डॉ. शंभरकर यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घातली. त्यानंतर गुरूवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राऊत, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणल्या व वेतन अदा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन तात्पूरते स्थगित केले. परंतु ५ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यास आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
५ जुलैपर्यंत वेतन न दिल्यास उपोषण
By admin | Updated: June 27, 2015 02:10 IST