लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पोलीस दादालोरा खिडकी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरा आयाेजित करण्यात आला आहे. ४६ शेतकरी १० दिवसांच्या अभ्यास दाैऱ्यावर गेले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करतील. या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक अनुज तारे याच्या मार्गदर्शनात अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा भागातील ४६ शेतकऱ्यांकरिता चौथ्यांदा कृषी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापुर्वी सुद्धा पोमके कोटमी हद्दीतील ३२ महिला शेतकऱ्यांची, उपविभाग भामरागड हद्दीतील ४० शेतकऱ्यांची, त्याप्रमाणे धानोरा, हेडरी व एटापल्ली उपविभागातील ४२ शेतकऱ्यांची कृषी सहल आयोजित करण्यात आली होती. या चौथ्या सहलीमध्ये अहेरी, जिमलगट्टा, सिरोंचा उपविभागातील अतिदुर्गम भागातील ४६ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. १६ ते २५ डिसेंबर हे १० दिवस शेतकरी विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. अभ्यास दौरा कार्यकमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, सिराेंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार यांनी सहकार्य केले.
या ठिकाणांना देणार भेटी सहलीत सहभागी शेतकरी नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, राहुरी, बारामती, पुणे, बाभळेश्वर, औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा, पैठण, अंबेजोगाई, परभणी, पोखर्णी तसेच ताडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एतिहासिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ येथील प्रसिद्ध लेण्या व गुफांना भेटी देणार आहेत.