शेतकरी संतप्त : बँकेने पाठविले वसुलीचे पत्रएटापल्ली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत एटापल्ली भागातील आदिवासी विविध कार्यकारी संस्था पीक कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतात. मात्र पीक कर्ज न घेतलेल्या तालुक्यातील हेडरी व रेकानार येथील आठ शेतकऱ्यांना कर्ज वसुलीबाबतचे पत्र जिल्हा बँकेने पाठविले आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या कारभारावर संतप्त झाले आहेत.यासंदर्भात हेडरी येथील शेतकरी गेसू लेकामी, पांडू कवडो, दामा कवडो, ओमची कवडो, सम्मा उसेंडी, बुकलू उसेंडी व रेकनार येथील विजय पुंगाटी, मुन्शी हिचामी यांनी एटापल्लीच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे हेडरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कारकून विशाल वाळके यांच्या विरोधात निवेदन सादर केले आहे. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, हेडरी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केली जाते. दरम्यान शेतीचा सातबारा धान खरेदीसाठी कारकूनकडे शेतकरी देतात. त्यानंतर धानविक्रीनंतर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे, असे सांगून आम्हा शेतकऱ्यांचे बँक पासबूक आपल्या ताब्यात घेतात. त्यानंतर आमच्या नावे पीक कर्जाचे प्रस्ताव तयार करून आम्हाला काहीही न विचारता परस्पर पीक कर्जाची उचल केली जाते. असाच प्रकार हेडरीच्या आविकाच्या कारकुनाने केला आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही हेडरीच्या पोलीस मदत केंद्रात लेखी तक्रार दाखल केली. याप्रकरणातील आरोपीस शिक्षाही झाली. मात्र आम्हा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
आविका संस्थेकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Updated: January 31, 2016 01:31 IST